अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली. संजीव बाबुराव चव्हाण (वय -54) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील एका गावातील पिडीत अल्पवयीन मुलगी 29 जुलै 2020 रोजी दुकानात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती दुकानात जात असताना आरोपी संजीव चव्हाण याने तिच्यावर पाळत ठेवली. तसेच ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिला आपल्या दुचाकीवर घेतले. त्यानंतर तो तिला घेऊन शिवारात गेला. त्याठिकाणी तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांनी 2 आॅगस्ट 2020 रोजी आरोपीला अटक करुन या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच गुन्ह्यात वापरलेले वाहन व पिडीत मुलगी आणि आरोपीचे कपडेही जप्त केले होते. तसेच पिडीत मुलीचा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला होता.

तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीचा जबाब, तपासी अधिकारी, घटनास्थळ पंचांसह अन्य काही साक्षी या खटल्यात महत्वपुर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरी व बावीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

Leave a Comment