पुणे दहशतीत! एकाच रात्रीत आढळले ५५ कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । काल रात्रभरात पुण्यात ५५ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात एकाएकी ५५ रुग्ण आढळल्याने पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ३१९वर पोहोचली असून आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील कसबा, भवानी पेठ, येरवडा, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय परिसरात हे करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

पुणे शहर जिल्ह्यात काल रात्रीपासून सकाळपर्यंत ५५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे काल शहर जिल्ह्यात १ हजार २६४ रुग्ण झाले होते, ही संख्या आता १ हजार ३१९वर पोहोचली आहे. तर २०६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून करोनामुळे दगावलेल्यांची संख्या ७७वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण तपासणी आणि चाचणी सुविधामध्ये वाढ केल्याने ही आकडेवारी वाढल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात ७० ते १०० पर्यंत रुग्ण संख्या वाढत आहे. आज संध्याकाळपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं सूत्रांनी सांगितलं.कोरोना रुग्णांची संख्या वाढीचा दर ७ ऐवजी ५ दिवसांवर आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. हा दर ८ ते १० दिवसांवर नेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

पुण्यात आढळलेले ५५ कोरोना रुग्ण कसबा, भवानी पेठ, येरवडा, हडपसर या क्षेत्रीय कार्यालय परिसरातील आहेत. हा परिसर झोपडपट्ट्यांचा आहे. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढत असल्याने या ठिकाणी हे रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे हे लोक आणखी किती जणांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहेत. तसेच ज्या परिसरात हे रुग्ण सापडले तो परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment