हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ म्हणजेच DA आणि DR मध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२३ पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना हा वाढीव महागाई भत्ता दिला जाईल आणि त्यानंतर त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होईल. या वाढीनंतर उत्तर प्रदेशातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत २८ टक्क्यांवरून थेट ४२ टक्क्यांवर जाईल.
उत्तर प्रदेश मीडिया रिपोर्ट्स नुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. DA आणि DR वाढीमुळे उत्तर प्रदेशातील १६ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ११. ५ लाख पेन्शनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे .
केंद्र सरकारने मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ केली होती.
यापूर्वी २४ मार्च रोजी केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारही आपल्या पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करणार आहे, ज्यामुळे ऊत्तर प्रदेशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे.
झारखंड सरकारने देखील वाढवला महागाई भत्ता-
एप्रिल महिन्याच्या अखेरीस , झारखंड सरकारनेही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली असून ती १ जानेवारीपासून ४२ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आली आहे. ह्या पगारवाढीसाठी राज्य सरकारला ४४१ कोटी ५२ लाख रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत.