ऑनलाइन शिक्षणापासून 80 टक्के विद्यार्थी वंचित, त्यांचे काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यात नववी ते बारावीचे 9.12 लाख विद्यार्थी आहेत. त्यापैकी जेमतेम 20 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचत आहे. तर ऑनलाईन अभ्यास, स्वाध्याय, रीड टू मीसारख्या उपक्रमांना नगण्य प्रतिसाद नोंदवला जात आहे. 80 टक्के विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 33 हजार 775 पालकांचे मोबाईल ‘रीड टू मी’ ॲप डाऊनलोड करून स्वयंअध्ययनासाठी उपलब्ध झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्टुडंट व्हाॅटस् ॲप बेस्ड् डिजिटल होम असेसमेंट (स्वाध्याय) उपक्रमात सुरुवातीला 1 लाख 97 हजार विद्यार्थी स्वाध्याय सोडवत होते. मात्र याकडे शाळांकडून दुर्लक्ष झाल्याने 26 व्या आठवड्यात केवळ 1787 विद्यार्थ्यांनी स्वाध्याय डाऊनलोड केला. कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणात 9.12 लाखांपैकी सरासरी 20 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सातत्याने सहभाग नाही. असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उर्वरित 80 टक्के म्हणजेच 7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल शिक्षक संघटना, शिक्षणतज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागासह डाएट, समग्र शिक्षा आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्रयत्न करत आहेत. मात्र अल्पावधीत शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणाची परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. नेटवर्कची समस्या, इंटरनेट, मोबाईल, साधनांच्या उपलब्धतेचा अभाव आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थी उपस्थितीबद्दल शाळांकडे अद्यापही ऑनलाईन शिक्षणाच्या प्रतिसादाबद्दल विचारणा केली नसल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. त्यामुळे काही उपक्रमशील शिक्षकांचे वर्ग, शाळा वगळता सध्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची स्थिती चिंताजनक आहे.

रीड टू मी ॲप इन्स्टॉल केलेले तालुकानिहाय विद्यार्थी –
औरंगाबाद शहर 1 – 6475
औरंगाबाद शहर 2 – 998
पैठण – 5800
खुलताबाद – 5235
कन्नड – 4484
गंगापूर – 1074
सोयगाव – 1007
फुलंब्री – 515
औरंगाबाद – 242

Leave a Comment