लॉकडाऊनमध्ये मजुरांनी ‘पार्ले-जी’ बिस्किटांवर शमवली भूक; कंपनीनं विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनदरम्यान शहरातून गावाला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी पार्ले-जी बिस्कीटं संजिवनी देणारी ठरली. लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना परवडणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांवरच आपली भूक शमवावी लागली. याचाच परिणाम म्हणून पार्ले-जीची एवढी विक्री झाली की मागील ८२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ ५ रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार होतं. काहींनी स्वत: खरेदी करुन खाल्लं तर काहींनी दुसऱ्यांसाठी मदत म्हणून बिस्किटं वाटली. लॉकडाऊनदरम्यान बहुतांश लोकांनी आपल्या घरी पार्ले-जी बिस्किटांचा स्टॉकच करुन ठेवला होता.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. पार्ले-जी हे १९३८ पासूनच ओळखीचं नाव असून अनेकांचा आवडता ब्रॅण्ड आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.

“कंपनीचा एकूण मार्केट शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वाढला आहे. यापैकी ८० ते ९० टक्के वाढ पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीतून झाली आहे,” असं पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयांक शाह म्हणाले. “पार्ले-जी हे सामान्यांचं बिस्कीट आहे, ज्या लोकांना ब्रेड परवडत नाही ते पार्ले-जी खरेदी करु शकतात. कोरोना संकटादरम्यान अनेक राज्य सरकारांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पार्ले-जी बिस्किटांची खरेदी केली,” असंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय लॉकडाऊन दरम्यान, सकस अन्न विकत न घेऊ न शकणाऱ्या लाखो मजुरांनी याकाळात केवळ बिस्किटांवर गुजराण केली. म्हणूनच गुड्डे, बॉरबोन, टायगर, मारी, मिल्क बिकीज या बिस्किटांसह पार्ले प्रॉडक्ट्सच्या मोनॅको या बिस्किटाच्या विक्रीतही वाढ पाहायला मिळाली. मागणी वाढल्यामुळे बिस्किट कंपन्यांन्या लॉकडाऊनच्या काळातही मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशनची साखळी मजबूत करावी लागली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment