पुण्यात 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या; कोयत्याने केले सपासप वार

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवसेंदिवस पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पुणे येथे एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी रात्री एका 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात घडली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अभिषेक राठोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात कोयत्याने सपासप वार करण्यात आले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती येरवडा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, या घटनेचा तपास सुरू केला. अद्याप अभिषेकचा खून का करण्यात आला? यामागे कोणाचा हात आहे? ही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळेच या घटनेचा येरवडा पोलीस खोलवर तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर, एका 17 वर्षीय मुलीवर RPF जवानाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना देखील पुण्यातच घडली आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटना ताज्या असतानाच बुधवारी पुण्यात एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे.