सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जावळी तालुक्यातील तोरणपेढा येथील शिवारात होळीच्या दिवशी रात्री जंगली श्वापदाच्या हल्ल्यात भेकरावर प्राणघातक हल्ला केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याची घटना काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, काटवली (ता. जावळी) येथील डोंगर परिसरात तोरणपेढा शिवारात होळीच्या रात्री एका भेकराची शिकार वन्य श्वापदांकडून झाली. काटवली ग्रामपंचायतीचे शिपाई, रामचंद्र कदम हे नुकतेच पिण्याचे पाणी पहाण्याकरीता गेले असता ही घटना निदर्शनास पडली आहे. यामध्ये भेकराचे शीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर त्याचे पाय इतरत्र पडल्याचे दिसले. या डोंगर परिसरात भेकर व डुकरांचा अधिवास असल्याने या भेकराची कोणी शिकार केली की त्यावर बिबट्याने हल्ला केला याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
सध्या वणव्यानी सर्वत्र डोंगररांगा बेचिराख झाल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम वन्य जीवांचा अधिवास नष्ट झाला आहे. त्यामुळे वन्य जीव आसऱ्याच्या शोधार्थ सैरभैर होऊन भटकत आहेत. त्यामुळे त्यांचा नाहक बळी जात आहे. वन विभागाने हे गांभीर्याने घेणे गरजेचं आहे.