हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया येथे शहरापासून काही अंतरावर असलेल्या मालदेपूर गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली आहे. या बोटीत तब्बल ४० जण होते. यातील ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अजूनही शोधाशोधी सुरु आहे. ओव्हरलोडमुळे ही बोट उलटली असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत बलियाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की बोटीत सुमारे 40 लोक होते. मुंडन संस्कारासाठी हे लोक सुखपुरा येथून गंगा घाटावर पोहोचले होते. जास्त लोकांच्यामुळे बोट ओव्हरलोड झाली आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले असून, इतर लोकांच्या शोधात व्यस्त आहेत.
आत्तापर्यंत ६ जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार काही लोक बेपत्ता असावेत. तर काही जण कास्क पुलाची दोरी पकडून बाहेर आले असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु या अपघातामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.