औरंगाबाद – पडेगाव परिसरातील अन्सार कॉलनी येथे घरफोडी करणाऱ्या विद्यार्थी असलेल्या चोरट्याला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महिलेच्या मतिमंद नातूशी मैत्री करून घरात प्रवेश मिळवल्यानंतर सदर विद्यार्थ्याने हा चोरीचा गुन्हा केला. त्याच्या ताब्यातून एक लाख ८६ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.
शेख आफताब शेख मुनीर (वय १९, रा.लोकसेवा दूध डेअरीमागे, अन्सार कॉलनी, पडेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या विद्यार्थी घरफोड्याचे नाव आहे. अन्सार कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक महिलेच्या घरातून चोरट्याने बुधवारी (ता. सहा) सोन्याच्या बांगड्या, गंठण, झुमके, अंगठी असा दोन लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, विलास मुठे, रमेश गायकवाड आदींच्या पथकाने शेख आफताबच्या घरावर छापा मारून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्सार कॉलनी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सोन्याचे एक गंठण, अंगठी, दोन बांगड्या, कानातील झुमके, पाच मोरण्या असा एकूण १ लाख ८६ हजार ५२५ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.