सांगली | कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव गर्दी करु नये, असे आवाहन केले असतानाही शहरातील मिरासाहेब दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारी रात्री सामुहिक नमाज पठण सुरू होते. सदरील घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मशिदीकडे धाव घेऊन तेथे उपस्थित असलेल्या ४१ जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये २१ जणांचा नावानिशी तर अनोळखी २० जणांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
सध्या रमजान महिना सुरू असल्याने सामुदायीक नमाज पठणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधी, दर्गा ट्रस्टी, मशिदीमधील मौलवी यांच्याशी बैठक घेऊन कोरोनाचे भान ठेवून रमजान महिन्यातील रोजे आणि घरातच नमाज पठण करावे, अशा सुचना करण्यात आल्या होत्या. तरीही काही ठिकाणी नियम डावलून सामुदायीक नमाज पठणाचे कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शुक्रवारी रात्री मिरासाहेब दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मशिदीमध्ये सामुदायीक नमाज पठण सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी मशिदीकडे धाव घेतली. त्यावेळी सुमारे ५० ते ६० जण नमाज पठण करीत असताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. कोरोनाचे नियम डावलून नमाज पठणासाठी गर्दी केल्याप्रकरणी २१ जणांवर नावानिशी गुन्हा दाखल करण्यात आला. तर अन्य अनोळखी २० जणांवरही गुन्हा दाखल केला.