सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
दांडिया दरम्यान झालेल्या वादानंतर पाठलाग करत युवकासह स्थानिक नागरिकावर बुधवारी मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून गोळ्या, पुंगळ्या तसेच धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयी मुलास ताब्यात घेतले होते. अमीर शेख (रा.वनवासवाडी), अभिजित भिसे (रा. यश ढाब्यामागे, कोंडवे), साहिल सावंत (रा. कोटेश्वर मंदिराजवळ, शुक्रवार पेठ), यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा) अशी गुन्हा दाखल असणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी, साताऱ्यातील व्यंकटपुरा पेठेत राहणारा यश संजय बीडकर (वय- 22) हा ता. 5 रोजी मित्रासमवेत सेंट पॉल स्कूलच्या मैदानावरील दांडिया पाहून घराकडे येत होता. वाटेत अभिजित भिसे याने यश सोबतच्या सर्वेश महाडिकच्या पायावर दुचाकी घातल्याने त्यांच्यात वाद झाला. वादानंतर यश हा मित्रासमवेत त्याठिकाणाहून निघून गेला. थोड्या वेळानंतर अमीर शेख, अभिजित भिसे हे साथीदारांसमवेत दुचाकीवरून मनामती चौकात आले. येथे यश बीडकरला पाहून अमीर शेखने कमरेचे पिस्तूल काढले. शेखने यशच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, ती त्याने चुकवली. याचदरम्यान त्याठिकाणी घडशी नावाचा एक व्यक्ती आला. घडशींनी शेखला असे करू नको, असे सांगण्यास सुरुवात केली. या वेळी शेखने घडशी यांना पकडत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावले व चाप ओढला. मात्र, गोळी मिसफायर झाली व पिस्तूलमधील गोळ्या खाली पडल्या. नागरिक आल्याचे पाहून अमीर शेखसह इतरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पाहणी करत घटनास्थळावरून रिकामी पुंगळी, जिवंत गोळ्या व घातक शस्त्रे जप्त केली. घटनास्थळाची पाहणी नंतर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी केली. यश बीडकरच्या फिर्यादीनुसार अमीर शेखसह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोळीबार केल्यानंतर संशयित पळून गेले असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याचा तपास उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे करीत आहेत.