सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल फडतरवाडी येथील पृथ्वीराज फडतरे या युवकावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत तावरे (रा. वाघोली) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अविनाश फडतरे मित्र समूह या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फडतरवाडी येथील पृथ्वीराज फडतरे या युवकाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे व अशांतता पसरवण्याचे काम केले आहे. त्याबद्दल वाठार पोलीस ठाण्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख प्रशांत तावरे, सुमित चव्हाण, प्रशांत निकम, विशाल जाधव, श्रीकांत निकम, वसंत धुमाळ, सचिन पवार, रमेश अहिरेकर, निखिल गुरव, संभाजी धुमाळ तसेच असंख्य शिवसैनिक यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या आक्षेपार्ह पोस्टचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या पोस्टचा आम्ही शिवसैनिक म्हणून जाहीररित्या निषेध करतो. प्रत्येक पदाची गरिमा असते. कोणत्याही पक्षाचा मंत्री असो किंवा नेता असो तो आपल्या कर्तुत्वाने त्या उंचीवर गेलेला असतो. परंतु समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा युवकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. पोलिसांनी जर या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नसती तर आम्ही या युवकाची गावातून गाढवावरून धिंड काढणार होतो. परंतु पोलिसांचा आम्ही आदर राखत पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत करत कायदा सुव्यवस्थेचे पालन केले, असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांनी सांगितले.