हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाण्याचे नवे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघेंविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे.
केदार दिघे यांच्यावर मुंबईच्या एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यासह त्यांच्या एका मित्रावर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण-
तक्रारदार महिला ही 23 वर्षाची असून त्या खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर म्हणून काम करतात. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने 28 जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये मेम्बरशीप घेण्याच्या बहाण्याने जेवणासाठी बोलावले होते. त्यानंतर क्लब मेम्बरशीपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगितले. त्यानंतर रोहित कपूरने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, त्यानंतर 31 जुलै रोजी पीडित महिलेने आपल्यावर बेतलेला प्रसंग तीन मित्रांना सांगितला.
त्यानंतर 1 ऑगस्ट 2022 ला तक्रारदार महिलेने तिच्या मित्राच्या मदतीने आरोपीस विचारणा केली असता त्याने प्रतिसाद दिला नाही आणि आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र असलेला आरोपी केदार दिघे याच्या मध्यस्थीने सदर पीडित महिलेस पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता न करण्याबाबत सांगितले. परंतु त्यास तक्रारदार महिलेनं नकार दिला असता आरोपी केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.