औरंगाबाद – वाळूचे उत्खनन करून वाहतुकीसाठी वाहतूक दाराकडून लाच मागणार्या पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व त्यांचा पंटर नारायण वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैठण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फिर्याद दाखल केली असून यावरून तहसीलदार व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षापुर्वी देखील पैठणचे तत्कालीन तहसीलदार यांच्यावरही दिवाळीदरम्यान लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यामुळे पैठण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत असून तक्रारदाराच्या भागीदारीत असणाऱ्या शिवपुर येथील शेतात अतिवृष्टीमुळे नदीच्या वाळू साठा झाला होता. दरम्यान या वाळूचा उपसा करणे व दोन हायवा द्वारे वाहतुकीसाठी तहसीलदार यांचा पंटर असलेल्या खाजगी इसम नारायण वाघ यांनी शुक्रवारी लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पैठण तहसील कार्यालयात पंच साक्षीदार समक्ष एक लाख तीस हजाराचा मासिक हप्ता स्वरूपात मागणी केली.
तक्रारदार व पंच यांनी तहसीलदार शेळके यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली असता, तहसीलदारांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्या बद्दल बोलणी करून नारायण वाघ यांना समक्ष भेटून घेण्याबाबत सूचना दिल्या. नारायण वाघ यांनी केलेल्या लाच मागणीचे समर्थन करून लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर पुन्हा वाघ यांनी तक्रार दाराकडे पंच साक्षीदार समक्ष एक लाख 30 हजाराच्या लाचेची मागणी केली. पैठण तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांनी लावलेल्या सापळ्यात तहसीलदार व त्यांचा पंटर अडकला.