सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे
वाळू तस्करी रोखण्यासाठी गस्त घालत असलेल्या तहसीलदार बाई माने यांच्या पथकाच्या गाडीवर सोमवारी पहाटे डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
तहसीलदार माने वाळू तस्करी रोखण्यासाठी तलाठी अमीर मुल्ला, कोतवाल गोरख जावीर,संजय माने यांच्या पथकासह गस्त घालत होत्या. आटपाडी- निंबवडे रस्त्यावर आबानगर चौकात भरधाव डंपर या पथकाला गुंगारा देत पसार झाला. पथकाने डंपरचा शोध सुरू केला. तेवढ्यात समोरून भरधाव डंपर (एम. एच. 37 बी 786) आला. चालकाने तहसीलदार असलेल्या पथकाच्या गाडीवर डंपर घातला.
महसूल पथकाच्या वाहन चालकाने प्रसंगावधानाने गाडी डाव्या बाजूला घेतली. परंतु गाडीला जोरदार धडक बसली. त्या धडकेमुळे डंपर व तहसीलदारांची गाडी एकमेकांत अडकून बसली. कोतवाल व तलाठी यांनी डंपरचालकाला पकडले. हा चालक जालना जिल्ह्यातील असल्याचे व डंपर मुढेवाडी येथील स्टोनक्रशर मालकाचा असल्याचे सांगण्यात आले.