नितिन गडकरींच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पहिला पोस्टर लॉन्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकीय वर्तुळात रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे व्यक्ती म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. देशभरातील अनेक रस्ते आणि वाहतूक महामार्ग नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच त्यांना हायवे मॅन ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते. दरम्यान, त्यांनी केलेल्या याच कामगिरीमुळे नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाला येत्या 27 ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. “गडकरी” या मराठी चित्रपटामध्ये नितीन गडकरी यांचा राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याचा प्रवास मांडण्यात आला आहे.

देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव नितीन गडकरी यांचे आहे. नितीन गडकरींनी आपल्या कार्यकाळात रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी महत्वाचे कामगिरी बजावली आहे. या पार्श्वभूमीवरच नितिन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. तर अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. सध्या या चित्रपटाचा फक्त पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र गडकरी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोणता अभिनेता साकारेल हे अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान गडकरी चित्रपटाविषयी माहिती देताना दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी म्हटले आहे की, “नितीन गडकरी यांनी राजकारणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या विविध बाजू जनतेला माहीतच आहेत. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि तरुण काळ तितकाच रंजक देखील आहे. त्यांच्या याच आयुष्याला आम्ही चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, येत्या 27 ऑक्टोबर रोजी गडकरी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.”