कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड- पाटण मार्गावर विहे घाटात दैव बलवत्तर म्हणून चार जणांच्या जीवावर बेतलेले थोडक्यात निभावले. विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत एक चारचाकी गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली. त्यामुळे सुदैवाने प्रवाशी वाचले. सदरची गाडी पाटण येथील व्यावसायिकाची असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- पाटण मार्गावर चारचाकी गाडी (क्र. एमएच- 50- एल- 0667) कठड्यावर गाडी अडकली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास चालकाला घाटातील वळणावर टर्न न बसल्याने गाडी थेट कठड्यावर चढली. या घटनेमुळे गाडीतील प्रवाशी चांगलेच भेदरलेले होते. गाडी कठड्यावर थांबताच प्रवाशी एका बाजूने गाडीतून खाली उतरले.
मारूती सुझूकी कंपनीची डीझायर ही गाडी घाटात कठड्यावर अडकल्याची माहिती मिळताच. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घाटातून प्रवास करणाऱ्या लोकांनी गाडीतील प्रवाशांना आधार दिला. तसेच मल्हारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली.