औरंगाबाद | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) रुग्णालयातून चोरी केलेले रेमडेसीविर इंजेक्शन विकणारी टोळी गजाआड करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घाटीच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसह दोन मेडीकल चालकांना गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी अनिल बोहते याच्यासह दोन मेडिकल चालक मंदार भालेराव, अभिजित तौर यांनी संगनमताने विना प्रिस्क्रिप्शन विना पावतीचे रेमडेसीविर इंजेक्शन विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. त्यानुसार ही टोळी प्रत्येकी 15 हजार रुपयात रेमडेसीविर इंजेक्शन विक्री करीत होते. याचा सुगावा पुंडलिकनगर पोलिसांना लागला, पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांनी मोठ्या प्रमाणात इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली.
रेमडेसीविर इंजेक्शनची काळाबाजारात विक्री करणाऱ्या या टोळीने अनेकांना गंडविल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली असून, मोठी टोळी जिल्ह्य़ात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.