हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची भव्य सभा पार पडली. या सभेसाठी मोठया प्रमाणात मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. त्यामुळे या विराट सभेत जरांगे पाटील नेमके काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आजच्या भाषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या सविस्तरपणे मांडल्या. तसेच, “आता एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयाची जल्लोष यात्रा निघेल” असा विश्वास जरांगे पाटलांनी उपस्थितीत जनसमुदायाला दिला.
त्याचबरोबर, “राज्य सरकारने येणाऱ्या 40 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यातले 30 दिवस संपले आहेत. आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे” असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर , “मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्या. कारण राज्यात सर्वात मोठा समाज मराठा आहे. मात्र सरकारकडून मराठा समाजाची उपेक्षा केली जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गठीत केलेल्या समितीच काम बंद करा. तुमचं आमचं जे ठरलं होतं, तसं होऊ द्या. मराठ्यांना ओबीसीत समावेश करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने तातडीने घ्यावा” असे जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्नांना घेऊन उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारपुढे पाच प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यातील प्रमुख मागणी ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. त्यामुळे या सर्व मागण्यांवर विचार करून निर्णय घेतला जाईल. असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आता जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत देखील संपत आली आहे. त्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.