सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात महापुरानंतर आता मगरींचे संकट समोर आलं आहे. सांगली शहरासह कसबे डिग्रज, भिलवडी, औदुंबर परिसरात पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त संचार सुरू आहे. पाणी ओसरू लागताच घराकडे परतणार्या लोकांना मगरींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळी सांगलीवाडी येथील धरण रोड परिसरातील वीर मराठा चौक येथे तब्बल १२ फुटी अजस्त्र मगर शेतकडेला पहुडलेली नागरिकांना दिसली आणि एकच खळबळ उडाली.
सांगली शहराजवळच मगरीचे वास्तव्य आल्याने पुरग्रस्त भागातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. याची माहिती नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने धाव घेत पाहणी केली असता ती मगर लिंगायत स्मशान भूमीतील एका झुडप्यात पहुडली होती. गावातील तरुणांनी धाडस करून या अजस्त्र मगरीला पकडले आणि तिला वनविभागाच्या स्वाधीन केले. वन विभागाने या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले.
अतिवृष्टी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला महापूर आला. सांगली शहरात कृष्णा नदीची पाणीपातळी विक्रमी ५५ फुटांपर्यंत पोहोचली होती. सोमवारी सकाळपासून महापूर ओसरू लागला आहे. मात्र, महापुराने विस्थापित झालेल्या लोकांसमोर आता मगरींचे संकट उभे राहिले आहे. पुराचे पाणी ओसरू लागताच नागरिक घरांकडे परतू लागले आहेत. यावेळी पूरग्रस्तांना मगरींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी दुपारी कसबे डिग्रज येथे पुराच्या पाण्यात मुक्त संचार करणाऱ्या मगरीचा व्हिडिओ काही तरुणांनी चित्रित केला आहे.
थेट गावातच मगरींचा वावर सुरू असल्याने पूरग्रस्तांना घराकडे परतण्याची भीती वाटत आहे. तर दुसरीकडे बुधवारी सकाळी सांगलीवाडी येथील वीर मराठा चौक येथे पुराच्या पाण्यातून तब्बल १२ फुटी मगर हि नागरीवस्तीत आढळली. गावामध्ये मगर आल्याची माहिती मिळताच याठिकाणी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखून या मगरीला नागरी वस्तीत जाण्यापासून रोखले.
त्यानंतर हि अजस्त्र मगर कृष्णेकाठी असलेल्या लिंगायत स्मशानभूमीकडे गेली. या घटनेची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यानी तातडीने धाव घेत पाहणी केली. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर सांगलीवाडीतील तरुणांनी धाडस करून या मगरीला पकडले. दरम्यान, अजूनही अनेक ठिकाणी पुराचे पाणी असल्याने पूरग्रस्तांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. या स्थितीत मगरींकडून हल्ले झाल्यास जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. याच परिसरात आता पुन्हा मगरींचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.