हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तेलंगानामध्ये एका खाजगी बसला भीषण आग लागल्यामुळे एक महिला जिवंत जाळली गेली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अन्य चार प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, खाजगी बसला आग लागल्याची घटना आज पहाटे हैदराबाद-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एररावल्ली चौकाजवळ घडली आहे.
आज पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्वो बस हैदराबादहून चित्तूरला निघाली होती. परंतु बस एररावल्ली चौकाजवळ येताच तीला आग लागली. या आगीची दाहकता एवढी होती की बस जागेवर पलटी झाली. त्यावेळी बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर उड्या मारत आपला जीव वाचवला. परंतु यातील एका महिलेला बाहेर पडताना आल्यामुळे ती आगीच्या भडक्यात सापडली. या दुर्घटनेमध्ये महिलेचा मृत्यू झाला. तर आणखीन चार प्रवासी जखमी झाले.
सांगितले जात आहे की, सध्या जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये बस पूर्णपणे होरपळून निघाली आहे. मुख्य म्हणजे बस चालवताना गाडी चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी घडलेल्या प्रकारासंबंधीत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.