बेपत्ता खासगी सावकाराचा तिघांनी केला खून : व्याजाचे पैशासाठी शिवीगाळ, दमदाटी केल्याने खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या खासगी सावकारांचा खून झाल्याचे घटना घडली. या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे. व्याजाने घेतलेल्या पैशासाठी त्रास देत असल्याने सावकांचा खून झाल्याचे कारण समोर आले आहे. विलास जाधव (रा. खोडद, ता. जि. सातारा) असे खून झालेल्या सावकारांचे नाव आहे. तर आकाश तुकाराम जांभळे (रा. जांभगाव, ता. जि. सातारा), संतोष संभाजी मोरे (रा. रामकृष्णनगर- काशीळ, ता. जि. सातारा), संजय रामचंद्र जाधव (रा. खोडद,ता. जि. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वा. चे सुमारास जयश्री विलास जाधव (रा. खोडद ता. जि. सातारा) यांनी पती विलास महिपती जाधव हे “जेवन करायला बाहेर जातो” असे सांगून घरातून निघून गेले होते. ते परत आले नाहीत. त्यामुळे बोरगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी दि. 22 रोजी दिली होती. तसेच मिसींग विलास जाधव यांचा घातपात झाला असल्याबाबत त्यांचे नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता.

बोरगाव पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासा दरम्यान ज्या लोकांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या लोकांबाबत गोपनीय माहिती प्राप्त केली. बेपत्ता व्यक्तीने बऱ्याच लोकांना व्याजाने पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तांत्रीक विश्लेषनावरुन व सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे अधिक तपास केला. तेव्हा बेपत्ता व्यक्तीने खोडद येथील ज्या लोकांना व्याजाने पैसे दिले आहेत. त्यापैकी तीन लोकांनी कट करुन त्यांचा खुन केल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. दरम्यान मिसींग विलास जाधव हे 20 नोव्हेंबर 2022 रोजी एका चारचाकी वाहनातून दोन इसमांच्या बरोबर जाताना निसराळे फाटा येथे विलास जाधव यांच्या एका नातेवाईकाने पाहिले होते. त्याबाबत त्याने तक्रारदार जयश्री जाधव यांना सांगितल्याने, जयश्री जाधव यांनी त्यांचे बेपत्ता पती विलास जाधव यांना दोन इसमांनी खून करण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याबाबत 28 नोव्हेंबर 2022 रोजी बोरगांव पोलीस ठाण्यास तक्रार दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विलास जाधव यांचे अपहरण केलेले दोन इसम निसराळे फाटा (ता. जि. सातारा) येथे आहेत. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकास नमुद इसमांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकाने नमुद दोन इसमांना निसराळे फाटा येथून ताब्यात घेवून त्यांच्याकडे चाैकशी केली. दोन्ही इसमांनी विलास जाधव यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरचे पैसे परत करण्याकरीता विलास जाधव शिवीगाळ दमदाटी करत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून नमुद दोन इसम व त्यांचा एक साथीदार यांनी गुन्हयाचा कट करून विलास जाधव यांचा खून केला असल्याचे सांगितले आहे. गुन्हयातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली असुन आरोपीने मयत विलास जाधव त्याचा मृतदेह टाकून दिल्याचे ठिकाण दाखवून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, संतोष सपकाळ, संतोष पवार, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, मुनिर मुल्ला, निलेश काटकर, अजित कर्णे, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, मोहन पवार, स्वप्निल माने, प्रविण पवार, वैभव सावंत, विशाल पवार, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, स्वप्नील दौंड, शिवाजी गुरव, गणेश कचरे, पंकज बेसके यांनी सदरची कारवाई केली आहे.