औरंगाबाद – दोन वर्षानंतर शक्तीशाली गुढ आवाजाने आज पुन्हा एकदा पैठण शहर व परीसर हादरला. 24 फेब्रुवारी, 2020 रोजी पैठण परिसराला गुढ आवाजाचा दणका बसला होता. गेल्या सात वर्षातील गुढ आवाजाचा आजचा 30 वा हादरा होता. विशेष म्हणजे, यापूर्वी पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत. यंदा मात्र जानेवारीत हादरा बसला आहे. भूकंप मापन यंत्रावर नोंद होत नसलेल्या या गुढ आवाजा समोर जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडियानेही हात टेकले आहेत. नेमका हा आवाज येतो कोठून हा यक्ष प्रश्न मात्र जनतेला भेडसावत आहे.
आज दुपारी 1.53 वा शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण शहर व परिसर हादरला. पैठण शहराच्या 10 किलोमीटर परिघात या गुढ आवाजाची तीव्रता जाणवली. आवाजाच्या तीव्रतेने नागरिकांमध्ये थोडावेळ चलबिचल झाली होती. पैठण शहरास व परिसरातील अनेक गावांना अशा आवाजाचे हादरे ठराविक कालावधीनंतर सातत्याने बसत आहेत. मात्र प्रशासनाकडून या आवाजाबाबत खुलासा होत नसल्याने जनतेत आवाजाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकिच्या काचा कंप पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली. या प्रकाराने नागरिकांची भितीने गाळण उडाली असे आखतवाडा येथील दादासाहेब म्हस्के, पैठण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया, बाजार समितीचे संचालक राजू टेकाळे, संजू कोरडे, मयुर वैद्य आदींनी सांगितले.
पैठण परिसरात अशा प्रकारच्या गूढ आवाजाचे नियमीत पणे हादरे बसत आहेत प्रत्येक वेळी जनतेत घबराट पसरते, या गुढ आवाजाची शहनिशा करून हा आवाज नेमका कशाचा आहे या बाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी जनतेतून मागणीही सातत्याने होत आहे. गेल्या 7 वर्षात आजचा 30 वा गुढ आवाज होता. दरम्यान गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ होत असल्याने जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पैठण परिसरात जायकवाडी सारखे मोठे 102 टी एम सी क्षमतेचे धरण असल्याने शंकाकुशंकेने नागरिकांची झोप उडाली आहे. वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र या बाबतीत मौन बाळगून आहे. प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ वाढतच चालले आहे.