औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून धडकी भरविणाऱ्या ओमायक्राॅनची परदेशातून प्रवास करून आलेल्या शहरातील एका नागरिकास बाधा झाल्याचे रविवारी समोर आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हा रुग्ण समोर आला. सध्या हा रुग्ण मुंबईतच विलगीकरणात आहे.
राज्यात रविवारी सहा नव्या ओमायक्राॅनबाधित रुग्णांची भर पडली. यात औरंगाबादेतील एका रुग्णाचा समावेश आहे. सदर रुग्ण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली. सदर रुग्णाचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. तसेच रुग्ण लक्षणविरहित आहे. सदर रुग्ण सध्या मुंबईतच विलगीकरणात असल्याने सध्या तरी औरंगाबादकरांना चिंता करण्याचे कारण नाही. हा ओमायक्राॅनबाधित रुग्ण टांझानिया अथवा इंग्लंडचा प्रवास करून आल्याचे समजते.
या संदर्भात औरंगाबादेतील आराेग्य यंत्रणेला रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती नव्हती. ही बाब ‘लोकमत’ने आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सदर रुग्ण जिल्ह्यात कोणत्या भागातील रहिवासी आहे, याचा शोध आरोग्य यंत्रणेने घेण्यास सुरुवात केली.