दहिवडी | जिल्ह्यातील माण तालुक्यात विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसात अंगावर वीज पडून एका मेंढपाळचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. भोजलींग डोंगरावर शेळ्या- मेढ्या घेवून गेलेल्या मेंढपाळबाबत ही दुर्घटना घडली.
काल सातारा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असते. दुपारच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस पडला. माण- खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. माण तालुक्यातील कापुसवाडी येथील मेंढपाळ संजय गोरड यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. गोरड हे परिसरातील भोजलींग डोंगरावर शेळ्या राखण्यासाठी गेले होते.
गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील बहुतांश भागात झाडे उन्मळून पडली. काही घरांवरील पत्रे उडून गेले. या पावसातच अंगावर वीज पडल्याने संजय गोरड यांचा जागीच मृत्यू झाला.