हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला कोणी केली आणि या निर्घृण हत्येमागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नाही. पोलीस सदर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी त्या परिसरात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आधी त्यांच्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले . आवारे हे रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
किशोर आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष होते. जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून त्यांनी तळेगावात विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. मुख्य म्हणजे समाजाशी त्यांचा मोठा जनसंपर्क होता. किशोर आवारे यांना मानणारा तळेगावात मोठा वर्ग होता. ६ वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून किशोर आवारे यांनी राजकारणात आपले स्थान भक्कम केले होते.