सांगली । शासनाच्या आदेशानुसार मनपा क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचा सर्व्हे करून संगणकीय प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी देणेबाबत विशेष कॅम्प घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. या संदर्भात शनिवारी त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या कालावधीत मनपाक्षेत्रात वास्तव्यात असणार्या दिव्यांग बांधवांचा सर्व्हे पूर्ण करून त्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी हेल्पलाईनसुद्धा सुरू केली जाणार आहे. या सर्व निर्णयाची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांची बैठक आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेत त्यांना सूचना केल्या. तसेच महापालिका क्षेत्रात वास्तव्यात असणार्या सर्व दिव्यांगांचा शोध घेऊन पहिल्यांदा त्यांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यात यावी.
त्यानंतर त्याची पडताळणी करून त्यांना ऑनलाईन पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे याबाबत सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक काम करावं असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष दिव्यांगासाठी सुरू केला जाणार जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.