पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; 78 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैसे वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना येमेनची (Yemen) राजधानी साना येथे घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 78 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. मृत आणि जखमी लोकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे . जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गरीब लोकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी तेथील व्यापाऱ्यांनी पैसे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सनाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या शहरात हे पैसे घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे बंडखोरांचे ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी सांगितलं. या घटनेनंतर बंडखोरांनी तात्काळ कार्यक्रम आयोजित केलेल्या शाळेला सील ठोकले आणि पत्रकारांसह लोकांना प्रवेश करण्यास मनाई केली.

या भीषण दुर्घटनेनांतर जखमी व्यक्तींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जकात वाटप कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना आणि व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश यमनच्या मंत्रालयाने अधिकाऱ्यांना दिले आहे. परंतु एकूणच पाहिले तर पैसे वाटपाचा हा कार्यक्रम नागरिकांच्या चांगलाच जीवावर बेतला आहे.