औरंगाबाद – शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. भाजप आणि शिवसेना हा पुतळा उभारण्यासाठी आग्रही आहे तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा पुतळा उभारण्यास विरोध दर्शवला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, असा सल्ला खासदारांनी दिला आहे. या वादात आता महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वक्तव्य केलंय. शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच. यासाठी मी पुढाकार घेईन, असे ते म्हणाले.
सिल्लोड नगरपरिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगीच्या कार्यक्रमात आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी औरंगाबादमधील महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीच्या वादासंबंधी ते बोलले. अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसणारच. तसेच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असं मी आवाहन केलं आहे. औरंगाबादेत हा पुतळा बसवताना मी स्वतः पुढे असेन.’
मागील आठवड्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला. पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, हाच शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रती आदर भाव असेल, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजपुत समाजाच्या वतीने शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. पुतळ्याला विरोध करणाऱ्या खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शिवसेना आमदार अंबादस दानवे यांनीदेखील, ज्यांना महाराणा प्रतापांचा इतिहास ठाऊक नाही, त्यांनी याविषयी काही बोलू नये, असा इशारा दिला होता. आता मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील या वादात पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे.