हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुण्यातील रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थिनी सुखरूप आहेत. मात्र, या आगीमध्ये विद्यार्थिनींचे शैक्षणिक सामान आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास लागली होती. त्यामुळे वसतीगृहात गोंधळ उडाला. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन ही आग विझवली.
समोर आलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींचे हे वसतिगृह प्रचंड मोठे आहे. आज सकाळी याच वस्तीगृहाला आग लागली होती. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळतात कसबा केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती. त्यामुळे जवानांनी सर्वात प्रथम विद्यार्थिनी सुखरूप आहेत का याची खात्री करून घेतली. तसेच सर्व विद्यार्थिनींना वसतिगृहाच्या बाहेर काढले. त्यानंतर ही आग जवानांकडून विझवण्यात आली.
परंतु वसतीगृहाला लागलेल्या या आगीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, वसतिगृहामध्ये असलेले लाकडी सामान आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. ही आग खोलीमधील हिटरमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आहे, तसेच विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण झाली आहे.