हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा बस्थानकात चोरट्यांकडून चोरीचे प्रकार केले जात आहेत. हातोहात कुणाचे दागिने तर कुणाच्या खिशातील पैशांची पाकिटे लंपास केली जात आहेत. अशीच घटना नुकतीच सातारा बसस्थानकात घडली. या ठिकाणी अज्ञात चोरट्याने सुमारे 2 लाखांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजश्री शंकर यादव (सध्या रा. गडकर आळी, सातारा) या दि. 13 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या (मूळ गावी सांगवड, ता. पाटण) यात्रेनिमित्त निघाल्या होत्या. त्यावेळी बस स्थानकात त्या आल्या. कराड – पाटणला जाणारी बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढण्यासाठी निघाल्या. त्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील 1 लाख 93 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली आहे.
बसमध्ये बसल्यानंतर राजश्री यांनीआपली पर्स उघडून पाहिली असता त्यांच्या लक्षात आले कि आपल्या पर्समधील सुमारे 1 लाख 93 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मोबाईल व रोख रक्कम हि नाहीशी झाली आहे. त्यांनी याबाबत इतरत्र शोधाशोध केली. मात्र, रक्कम मिळाली नाही. अखेर त्यांनी याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जी. डी. पवार करीत आहेत.