औरंगाबाद – कन्नड-सिल्लोड महामार्गावर मंगळवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात भराडी येथील माजी ग्रा.पं.सदस्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला व इतर गंभीर जखमी झाले.
जीपमधील सर्वजण नाशिक येथून लग्नसमारंभ उरकून भराडीला परतत होते. रात्री दीडच्या सुमारास कन्नड तालुक्यातील सारोळा व मोहाडीफाट्यादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे नाशिक येथून परतणारी जीप (MH 20 BC 6623) उलटली.
अपघातानंतर जीप दोन पलट्या घेऊन बाजूच्या शेतात जाऊन थांबली. या अपघातात भराडीचे माजी ग्रा.पं.सदस्य प्रदीपसिंग सुंदरसिंग गौर (वय 56) व लता शिवसिंग गौर (वय 50) हे दोघे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती समजताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सपोनि कोमल शिंदे, बीट जमादार वसंत पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने सिल्लोड येथील रुग्णालयात हलवले.
या अपघाताची माहिती सकाळी गावात कळताच भराडीवर शोककळा पसरली.पंचनाम्यानंतर पिशोर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.