सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके शेतामध्ये गाई घेऊन निघालेली एक महिला गाईसह विहिरीतील पाण्यात पडल्याची घटना सातारा जिल्ह्यातील आर्वी या गावात घडली आहे. या घटनेमध्ये ग्रामस्थांना गाईला वाचवण्यात यश आले असून महिलेचा मात्र, मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथील मसनवटा नावाच्या शिवारात संगीता पोपट राऊत (वय 35) या गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घरानजीक बांधलेल्या गाई गोठ्यात बांधायला जात होत्या. यावेळी त्या विहिरीशेजारून निघाल्या होत्या. त्यावेळी अचानक गाई बुजल्याने त्या गाईसह विहिरीतील पाण्यात पडल्या. विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज हा संगीता राऊत यांचे पती पोपट राऊत यांच्या कानावर पडला. यावेळी त्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली आणि विहिरीत वाकून पाहिले असता त्यांना गाई विहिरीत पोहताना व जवळच दोन चप्पल तरंगताना दिसलय.
यानंतर त्यांना आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील माजी पंचायत समिती सदस्य विकास राऊत, पोलीस पाटील प्रकाश पाटील, पंकज पवार, पवन शेठ जाधव, बाळासाहेब जाधव, राजेंद्र घोरपडे, सोमनाथ पवार, संजय टकले, निलेश शिंदे, महादेव खंडागळे, यासह युवकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यांनी विहिरीत पडलेल्या गाईला व बुडालेल्या संगीता राऊत यांना विहिरीतून बाहेर काढले. यानंतर या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. संगीता राऊत यांच्या पश्चात त्यांचे पती पोपट वसंत राऊत व मुलगी प्रतीक्षा हे कुटूंबात आहेत.