हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागात युवक नदी तसेच विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र, पोहताना बुडाल्याच्याही घटना घडत आहेत. अशीच घटना पाटण तालुक्यातील कोयनानगर मधील कोयना धरण परिसरात मंगळवारी घडली. कोयना धरणात पोहायला गेलेला गाडखोप गावातील अर्जुन शरद कदम (वय 22) हा युवक धरणातील गाळमिश्रित पाण्यात अडकून बेपत्ता झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडखोप या गावातील 4 ते 5 युवक कोयना धरणाच्या पात्रात बाजे या ठिकाणी पोहायला गेले होते. यामध्ये अर्जुन हा देखील पोहायला गेला होता. कोयना धरणात सध्या गाळमिश्रीत पाणी असल्यामुळे पोहताना अर्जुन हा खोल गाळात सकून रुतून बसल्याने तो दिसेनासा झाला. अर्जुन दिसेनासा झाल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. संबंधित युवकांनी याची माहिती अर्जुनच्या कुटूंबियांना आव पोलिसांना दिली. त्यानंतर कुटूंबीय व पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत अर्जुनला शोधण्याचे काम सुरु केले आहे.
धरणातच्या काठावर पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या युवकांमध्ये अर्जुन हा खोल गाळात अडकून रुतून बसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युवकाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची नोंद कोयना पोलीस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.