हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना शिवीगाळ केली. सत्तार यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अवघ्या ३-४ तासात राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यभर रान उठवत सत्तार यांचा निषेध नोंदविला. विशेष म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सत्तारांविरोधात आक्रमक झाली असताना दुसरीकडे शिंदे गटानेही याप्रकरणी हात झटकल्याचे पाहायला मिळत आहे.
एका वृत्तवाहीनिशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना भिकार** असं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पेटून उठली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी अब्दूल सत्तार यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर आंदोलन केलं. यावेळी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करत काचाही फोडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचं आक्रमक रूप पाहता काहीतरी कारणे देत सत्तारांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आणि हा विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
सिल्लोड दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंना टीकेची आयती संधी –
खरं तर आज सत्तार यांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची सभा आहे. त्यामुळे मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची संधी त्यांना होती. मात्र तत्पूर्वीच सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सत्तार याना बॅकफूटवर जावं लागलं. याउलट दुसरीकडे सिल्लोड दौऱ्यावरच असलेल्या आदित्य ठाकरे यांना सत्तार यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळाली. आदित्य ठाकरे आपल्या जाहीर भाषणात सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला. अब्दुल सत्तार यांच्यासारखी घाणेरडी लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवेत का, असे लोक मंत्री म्हणून चालणार आहेत का? असा थेट सवाल करत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारलाच घेरण्याचा प्रयत्न केला.
शिंदे गटाने हात झटकले –
दुसरीकडे, शिंदे गटानेही सत्तार यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण आमचे मंत्रीमहोदय अब्दुल सत्तार यांनी एखादे चुकीचे वक्तव्य केले असेल तर ती गोष्ट योग्य नाही, असं म्हणत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी हात झटकले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही याप्रकरणी पक्षाकडून सुप्रिया सुळे यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. पवार कुटुंबियांवर कोणीही व्यक्तिगत बोलू नये असं म्हणत त्यांनी सत्तारांचे कान टोचले आहेत.