औरंगाबाद | प्रतिनिधी
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप महायुती, वंचित बहुजन आघाडीसह तब्बल 30 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असून, तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून यामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्याचे मतदान येत्या २३ एप्रिल रोजी होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण ४२ उमेदवारांनी ६२ अर्ज दाखल केले होते. ४ एप्रिल रोजी झालेल्या छाननीत १२ उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे ३० उमेदवार आता रिंगणात उरले आहेत. शिवसेना-भाजप युतीचे चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आमदार सुभाष झांबड, वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सुभाष पाटील यांच्यासह छोटे पक्ष आणि अपक्षांसह ३० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती.
आमदार अब्दुल सत्तार कार्यकर्त्यांसह दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले व त्यानी जातीवादी शक्तीला फायदा मिळू नये व सेक्युलर मतदार फुटू नये हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याने मी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचं सत्तार यांनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलं. काँग्रेसचा प्रचार करणार नसून ३६ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीच पक्षान हे फळ दिलं असल्याचे सांगत झांबड यांच्या बद्दल खदखद वक्त केली. याचा निर्णय १५ तारखे नंतर सांगणार आल्याचंही सत्तार यांनी यावेळी सांगितलं.शिवसेना आणि काँग्रेस सोडून कुणालाही पाठिंबा देऊ शकतो.गरज पडल्यास एम आय एम च्या उमेदवारास मदत करू असेही सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर बोलून दाखवले.