वागवान कुटुंबियांना परवानगीचे पत्र देणे गृहखाते सचिवांच्या अंगलट, अभिनव गुप्त सक्तीच्या रजेवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | येस बँक घोटाळ्यातील वागवान कुटुंबाला लोणावळ्याहून पाचगणीला जाण्यासाठी गृहखात्याचे प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांनी परवानगीचे पत्र दिले होते. वागवान कुटुंबियांना सदर परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल रात्री सांगितले होते. त्यानुसार आता पत्र देणारे गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे समजत आहे. यामुळे वागवान कुटुंबियांना परवानगीचे पत्र देणे प्रधान सचिवांच्या अंगलटी आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली असून राज्याच्या गृहखात्याचे प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे. लवकरच गुप्ता यांच्यावर चौकशी समिती नेमली जाईल असंही देशमुख यांनी सांगितले. सदर अधिकार्‍यावर तातडिने कारवाई केल्याने अनेकांकडून देशमुख यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान, सर्वत्र जिल्हाबंदी असताना वागवान कुटुंब पाचगणीत पोहोचलेच कसे यावर अनेक चर्चा रंगत होत्या. थेट मंत्रालयातील पत्र वागवान कुटुंबियांकडे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय होतोय अशी टीका नागरिकांकडून केली जात होती.