चांदणी चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती; चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज (शनिवारी) पुण्यातील चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हजर राहणार नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्यामुळे एकनाथ शिंदे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित खात्यांचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. त्याचबरोबर, लवकरच अजित पवार गट शिंदे गटातील तेरा खासदारांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करणार असल्यामुळे देखील ही बाब एकनाथ शिंदे यांना आवडली नसल्याचे म्हटले जात आहे. सध्या अशा अनेक कारणांवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तेढ निर्माण झाली आहे. याचाच परिणाम बघता एकनाथ शिंदे चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच साताऱ्याला कामानिमित्त जाताना एकनाथ शिंदे यांना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. या वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. मात्र आता या वाहतूक कोंडीचा प्रश्न उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले की मिटणार आहे. चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांना मुळशी ते सातारा, मुळशी ते मुबंई, मुळशी ते पाषाण, सातारा ते कोथरूड -मुळशी, पाषाण ते मुबंई, पाषाण ते सातारा, सातारा-कोथरूड ते पाषाण, सातारा ते मुळशी असा प्रवास करणे सोपे जाणार आहे.