सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा कडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सातारा शहरात 1075 फूटी भव्य तिरंगा पदायात्रेचे आज आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अभाविपने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या शेवटला व विद्यार्थी परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
या पदयात्रेचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पाटील व प्रमुख वक्ते म्हणून अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला उपस्थित होते. पोलीस कवायत मैदानापासून सुरू होऊन ही पदयात्रा बस स्टँड, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, शाहू चौक, राजपथ, मोती चौक या मार्गावरून पुढे गांधी मैदानावर या यात्रेचा समारोप जाहीर सभेने करण्यात आला. या पदयात्रेत साताऱ्यातील विविध महाविद्यालय, अकॅडमी मधून ८०० विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा संयोजक पराग कुलकर्णी यांनी केले. शहर कार्यकारणी सातारा जिल्हा प्रमुख सरिता बलशेटवार यांनी केली. शहर अध्यक्ष म्हणून प्रा. गजानन गुरव व शहर मंत्री म्हणून कृपा गोळे यांची घोषणा केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सातारा शहर अध्यक्ष प्रा. गुरव सर यांनी केले व सूत्रसंचालन महेश ढाके व ऋतुजा साळुंखे यांनी केली. रमा शिवदे यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला.