औरंगाबाद – आम्हाला पाणीपट्टी जास्त आली, आमचा वापर कमी असतानाही पाणीपट्टी वाढून येत आहे, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला येतात. यामुळे आता विद्युत मीटरच्या धर्तीवर नळांनाही जलमीटर बसणार आहेत. नळधारक जेवढे पाणी वापरेल. त्यानुसार त्यांना पाणीबिल भरावे लागणार आहे. या वर्षभरात शहरातील तब्बल 2 हजार 700 व्यावसायिक नळांना हे जलमीटर बसवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटी रुपयांची नवीन जलयोजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. योजना पूर्ण करताना शहरातील नळांना मीटर बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मिटर बसविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील सुमारे 5 हजार व्यावसायिक नळांना जलमीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्ट्रॉसॉनिक स्मार्ट प्रकारचे हे जलमीटर राहणार आहेत. मोठ्या आकाराच्या नळ कनेक्शनच्या एका जलमीटरची किंमत लाखाहून अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी 5 हजार मिटरसाठी तब्बल 13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सध्या 2 हजार 700 एवढे व्यावसायिक नळ आहेत. वर्षभरात शहरातील सर्व व्यावसायिक नळांना मिटर लागतील, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नववर्षाच्या संकल्प अहवालात नमूद केले आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी आता लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. सुमारे पाच हजार नळांसाठी 13 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी समांतर जल योजनेत शहरातील नळांना मीटर बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी मीटरच्या किमतीवरून मोठा वाद झाला. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत बसविल्या जाणाऱ्या जलमीटरची किंमत किती असेल, ती रक्कम महापालिका भरणार की व्यावसायिक नळधारकांकडून केली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सध्या महापालिकेकडून अर्धा इंची व्यावसायिक नळासाठी वर्षाची 20 हजार रूपये पाणीपट्टी वसूल केली जाते. नळांच्या आकारानुरूप सर्वाधिक पाणीपट्टी रक्कम ही वर्षाकाठी 10 लाखापर्यंतही आकारली जाते. सद्यः स्थितीत पालिका पाचव्या ते सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करते. त्यामुळे मिटर लागल्यास ग्राहकांना कमी पाणीपट्टी येऊ शकते, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.