कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वाघासह बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्या आरोपींच्या घर आणि दुकानावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी एका आरोपीच्या ज्वेलर्स दुकानात आणखी 9 नख्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाने आजअखेर आरोपींकडून 20 नख्या हस्तगत केल्या असून या सर्व नख्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत. या तस्करीत आंतरराज्य टोळीचा सहभाग असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परराज्यातील एकाचा हात यामध्ये निष्पन्न झाला असून वन विभागाचे पथक त्याच्या तपासासाठी रवाना झाले आहे. मात्र, अद्यापही ठोस माहिती या पथकाच्या हाती लागलेली नाही. दिनेश बाबूलालजी रावल (वय 38, रा. सोमवार पेठ, कराड) व अनुप अरुण रेवणकर (वय 36, रा. रविवार पेठ, कराड) अशी याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
कराडातील दोघांकडे वाघ आणि बिबट्याच्या नख्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर सोमवारी, दि. 16 वन विभागाने सापळा रचला. नख्या खरेदी करण्याच्या बहाण्याने दिनेश रावल याला बोलावून घेतले. शहरातील कृष्णा नाक्यावर असलेल्या सावित्री कॉर्नर इमारतीत तो आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन नख्या हस्तगत करण्यात आल्या. तर त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत अनुप रेवणकर याचे नाव निष्पन्न झाले. काझी वाड्यानजीकच्या गोल्ड पॅलेस दुकानावर छापा टाकून पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी नऊ नख्या हस्तगत करण्यात आल्या. या नख्या त्यांनी कोठून आणल्या, याबाबत सध्या कसून तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास करताना गुरूवारी वन विभागाच्या पथकाने अनुप रेवणकर याच्या घरासह दुकानाची पुन्हा एकदा झडती घेतली. त्यावेळी त्याच्या दुकानात आणखी नऊ नख्या आढळून आल्या आहेत. वन विभागाने त्या जप्त केल्या आहेत. मात्र, त्या नख्या नेमक्या कोणत्या प्राण्याच्या आहेत, याबाबत खात्रीशिरपणे काही सांगता येत नसल्याचे वनाधिकारी नवले यांनी सांगीतले. संबंधित नख्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहेत.
आणखी तीन दिवस कोठडी
अटकेत असलेल्या दिनेश रावल व अनुप रेवणकर या दोघांच्या वन कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना आणखी तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.