कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डींग लावलीय. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांकडून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर अनेकांकडून भेट घेत मागणी केली जात आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील राजकारण नेहमीच सहकारावर अवलंबून राहिले आहे. त्यातूनच निर्माण झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उभारणीत आणि नावलौकिक वाढवण्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आणि स्वातंत्र्य सैनिक किसन वीर यांचे मोठे योगदान आहे. कोरोनाच्या महामारीमुळे रखडलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. सहकार क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवून देशात अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उमेदवारी मिळावी यासाठी सहकार मंत्री पाटील यांच्याकडे अनेक कार्यकर्ते संपर्कात राहून मागणी करत आहेत.
दरम्यान, सोसायटी मतदार संघातून प्रत्येक तालुक्यातील एक प्रतिनिधी, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातून एक प्रतिनिधी, दोन महिला प्रतिनिधी, भटक्या विमुक्तमधून एक प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती मधून एक प्रतिनिधी, कृषी उत्पादन प्रक्रिया संस्थांमधून एक, नागरी बँका व विविध संस्थांमधून एक, गृहनिर्माण दूध उत्पादक व इतर संस्थांमधून एक, औद्योगिक ग्राहक संस्था व पाणीपुरवठा आदी संस्थांमधून एक व इतर मागासवर्गीय मधून एक असे एकूण २१ उमेदवारांची निवड केली जाणार आहे. जिल्हा बॅंकेची उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री पाटील यांच्याकडे अनेकांनी मागणीही केली आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सर्व ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचाराने उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंत्री पाटील यांचा जिल्ह्यातील आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते व ज्येष्ठांसह सहकारातील धुरीनांना सोबत घेवून जिल्हा बँकेची निवडणूक पार पाडण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.