कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोकनेते विलासकाका पाटील जिल्हा बॅंकेचा आर्थिक पाया रचला. काकांनी शेवटच्या श्वासापर्यंत तत्वाशी तडजोड केली नाही. त्यामुळे काकांची विचारधारा पुढे नेण्यासाठी न झुकता स्वाभिमानाने लढलो. यापुढे काॅंग्रेस पक्ष म्हणून संघटनेतील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुका जबाबदारीने लढण्यासाठी सज्ज व्हावे, अशी हाक काॅंग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अॅड. उंडाळकर यांच्या उपस्थितीत मतदारांचा आभार मेळावा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कॉंग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, आप्पासाहेब गरुड, कोयना संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, अविनाश नलवडे, शैलेश चव्हाण, हणमंतराव चव्हाण, प्रा. गणपतराव कणसे, उपसभापती रमेश देशमुख, बाजार समिती सभापती महादेव देसाई, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.
ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, बऱ्याच जणांनी मला तडजोड करावी, असं सांगितलं. मात्र, सत्तेसाठी लाचारी पत्करुन काकांच्या विचारधारेला तिलांजली देणं हे मला योग्य वाटलं नाही. त्यामुळं मी सत्तेपुढं न झुकता स्वाभिमानं लढलो. दुर्दैवानं निवडणुकी मला काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याला मी पराभव मानत नाही. मी सर्वसामान्य माणसांच्या जीवावर सत्तेशी झुंज दिली. रयत संघटनेच्या आणि कॉंग्रेस पक्षाच्या जीवावर मी झुंज दिली. जिल्हा बॅंकेसाठी मी माझा स्वाभिमान सत्ताधिशांच्या पायाशी ठेवला नाही.