मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी म्हणून चर्चेत असणाऱ्या रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ज्यावर ११ वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निर्णयानंतर सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसच करणार की सीबीआय हे स्पष्ट होणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी सुशांतनं वयाच्या ३४ व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळंच झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. किंबहुना याप्रकरणी विविध अंगानं तपासही करण्यात येत आहे. दरम्यान, हा तपास सुरु असतानाच रियाच्या अडचणी तेव्हा वाढल्या, ज्यावेळी सुशांतच्या वडिलांनी तिच्यासह तिच्या कुटुंबीयांवरही फसवणुक आणि सुशांतचा मानसिक छळ केल्याप्रकरणीचे गंभीर आरोप केले. इतकंच नव्हे, तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर रिया आणि इतर काही जणांवर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणीच्या सुनावणीदरम्यान, रियानं सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. याप्रकरणीचा तपास सीबीआयच्या हाती सोपवण्याचा राज्याला अधिकार नसल्याची बाब उचलून धरली होती. मंगळवारी रियाकडून आलेल्या वक्तव्यामध्ये तिनं या प्रकरणात खोटी माहिती पुरवण्यात येत असून त्याला राजकीय वळण दिलं जात असल्याचं मत मांडलं. बिहारमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते या प्रकरणात त्यांची पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही तिनं केला
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”