हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झालं आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार पाहायला मीळत होता. सुलोचना दीदींच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
3 जून रोजी सुलोचना दीदी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, व्हेंटिलेटरवर ठेऊनही त्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना लाटकर यांचे अंतिम दर्शन उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांच्या 11, प्रभा मंदिर सीएचएस,प्रभा नगर, पी.बाळू मार्ग नगर, प्रभादेवी. मुंबई या निवासस्थानी घेता येणार आहे. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सुलोचना दीदींनी आपल्या सोज्वळ, निरागस अभिनयातून चाहत्यांची मने जिंकली होती. त्यांनी मराठीमध्ये 50, तर हिंदीत 250 सिनेमांमध्ये भाग घेतला होता. त्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र तसेच दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीबाबत सांगायचं झाल्यास त्यांनी बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. त्यांना त्यांच्या दमदार अभियानामुळे 1999 मध्ये ‘पद्मश्री’, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.