हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अदानी समूहाने (Adani Group) व्यवसाय क्षेत्रातील अनेक कंपन्या आपल्या ताब्यात करून घेतल्या आहेत. आता सिमेंट क्षेत्रातीलही आणखीन एक नामांकित कंपनी अदानी समूहाचा भाग बनली आहे. अंबुजा सिमेंटसोबत अदानी समूहाने नुकताच एक करार केला असून त्यानुसार, अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) कंपनीने संघी सिमेंटचे (Sanghi Cement) अधिग्रहण केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या कराराअंतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या प्रोमोटर्सकडून 56.74 टक्के स्टेक घेणार आहे. या करारामुळे अदानी समूहाचा सिमेंट क्षेत्रातील दबदबा वाढला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बाजार उघडण्यापूर्वीच अदानी कंपनीनं कराराची घोषणा केली आहे. यामध्ये अंबुजा सिमेंट कंपनीने संघी सिमेंटचे अधिग्रहण केल्याची माहिती देण्यात आली. दोन्ही कंपन्यांने केलेला हा करार 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट कंपनी प्रमोटर समूह रवी सांघी यांच्याकडून बहुसंख्य स्टेक घेणार आहेत. त्यामुळे हे अतिग्रहन पूर्णपणे अंतर्गत स्रोतांमधून केले जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. याचा मोठा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे.
या कराराविषयी बोलताना गौतम अदानी यांनी म्हटले आहे की, दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे अंबुजा सिमेंटची प्रतिमा बाजारपेठेत उंचावण्यास मदत होणार आहे. अधिग्रहणामुळे आम्ही 2028 पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू. सध्या कंपनी सिमेंट उत्पादनात 140 एमटीपीए झेप घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या संघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे. पुढील दोन वर्षात अंबुजा सिमेंट संघीपुरम येथील सिमेंट क्षमता 15 एमटीपीएपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नात असेल.
मुख्य म्हणजे, अंबुजा सिमेंट कंपनी आणि संघी सिमेंटमध्ये झालेल्या कराराचा विशेष परिणाम शेअर्सवर ही पडला आहे. कंपनीकडून कराराची घोषणा होताच शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. यामध्ये अंबुजा सिमेंटचा स्टॉक तेजीत वाढत आहे. या करारानंतर कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांनी वाढून 466.6 रुपयांवर पोहचले आहेत. या शेअर्समध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर अदानी समूहाचे शेअर्स देखील उंचावलेले दिसत आहेत. यातूनच कंपनीला कराराचा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.