हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. देशातील विरोधी पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला असून मोदी सरकारचे हे धोरण अंबानी – अदानी या उद्योगपतीना मदत करण्यासाठीच आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर अदानी उद्योग समुहाने एक पत्रक जारी करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा कृषीमाल खरेदी करत नाही किंवा कृषीमालाची किंमत ठरवण्यातही आमची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगत अदानी समूहाने शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांना होणाऱ्या विरोधामध्ये अनेकदा नाव आल्यानंतर अदानी समुहाने आम्ही शेतकऱ्यांकडून थेट धान्य विकत घेत नाही आणि त्याचे मुल्यही ठरवत नाही असं म्हटलं आहे. ऊर्जा क्षेत्रातील मोठं नाव असणाऱ्या अदानी समुहाने आपण फक्त फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी गोदामांची देखभाल आणि व्यवस्थापन करतो असंही स्पष्ट केलं आहे. “किती धान्य या गोदांमांमध्ये साठवण्यात यावं तसेच त्याची किंमत किती असावी हे निश्चित करण्याशी कंपनीची काहीही संबंध नाहीय. आम्ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला केवळ गोदामांची सेवा आणि गोदामं उपलब्ध करुन देतो,” असं कंपनीने ट्विटवरुन जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
काही कृषी संघटनांनी अदानी समुहाकडून गोदामांमध्ये धान्याची साठवण केली जाते आणि ते अधिक किंमतीला विकले जाते असे आरोप केलेत. मात्र आमचा धान्य उत्पादन आणि ते शेतकऱ्यांकडून विकत घेण्यामध्ये तसेच त्याची किंमत ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीच सहभाग नाहीय, असं अदानी समुहाने म्हटलं आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियालासाठी गोदामं बांधणं आणि त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्योगामध्ये अदानी समुह २००५ पासून असल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारत सरकारकडून निविदा प्रक्रियेमार्फत देण्यात येणाऱ्या कंत्राटानुसारच आम्ही हे काम मिळवत आलेलो आहोत, हे ही कंपनीने नमूद केलं आहे.
शेतकऱ्यांचा नेमका आक्षेप काय?
मोदी सरकारने अदानी आणि अंबानी समूहाच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अदानी समूहाकडून धान्याची मोठ्याप्रमाणावर आणि दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी गोदामांची निर्मिती केली जात आहे. जेणेकरून नंतर हे धान्य त्यांना अधिक किंमतीने विकता येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’