यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ जिल्हयाच्या बोरी अरब क्षेत्रातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांढुर्णा बोद गव्हाण येथील नागरिकांत ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल असंतोष खदखदत आहे. या ग्रामपंचायतीन भ्रष्ट व अनियमित कारभाराचा कळस गाठल्यामुळ शेवटी जनतेला उठाव करावा लागला. याकरिता आवाज उठवून गावकऱ्यांनी ताट-वाटी वाजवीत ग्रामपंचायतीला विविध विकास कामाकरिता मिळालेला निधी व केलेल्या खर्चात झालेला भ्रष्टाचार गटविकास अधिकारी यांच्या समक्ष ठेवला आहे.
आदर्श गाव असलेले पांढुर्णा येथील ग्रामपंचायत मधील अनिमित कारभाराचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. आदर्श गाव असल्यामुळे या गावाचे उदाहरण इतर दुसऱ्या गावांना देऊन त्यांनाही आदर्श पुरस्कार मिळण्यास प्रोत्साहन देण्याच काम तालुका व जिल्हा पातळीवर होत होते.परंतु आज पांढुर्णा गावाने भ्रष्टाचाराची बाब आंदोलनच्या माध्यमातून निदर्शनास आणली आहे. गावकऱ्यांनी यापूर्वी भ्रटाचाराबाबत अनेक निवेदने पंचायत समिती स्तरावर दिली होती. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही न करता सारवा-साराव करून प्रकरण पुढे ढकलले होते.
शेवटी गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्याकरिता त्यांनी संपूर्ण गावामध्ये ग्रामपंचायत कारभारा विरुद्ध ताट-वाटी, चमच्याने वाजवित नारेबाजी केली. सोबतच आंदोलकांनी संपूर्ण गावाची प्रदक्षिणा केली. याबाबत त्यांनी दारव्हा गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तांत्रिक अभियंता, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून ही बाब लक्षात आणून दिली.