हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उद्भवलेल्या पूर स्थितीवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकीकडे महाराष्ट्रात भयंकर पूर परिस्थिती आहे. यामध्ये पूरग्रस्त आणि नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र फोडाफोडी आणि राजकारणात मग्न आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात राजकीय परिस्थिती काहीही असली, तरी युवासेना आणि शिवसेनेनं आपली कामे थांबवलेली नाहीत. कार्यकर्त्यांनी राजकरणाच्या बळी पडू नये आणि जिथे पूर परिस्थिती आहे, तिथे लोकांना मदत करावी, असे आवाहन युवासेनेला केले आहे.
शिंदेंसोबत जे बंडखोर आमदार गेले आहेत. त्यांचा उद्धव ठाकरेंवर, ठाकरे परिवारावर आणि शिवसेनेवर राग आहे. ते जरी आमचा राग करत असतील तरी आमच्या मनात त्यांच्याबाबत राग नाही. त्यांच्याबाबत दुःख वाटते की, त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. असा कोणी पक्ष फोडून गट तयार करत असेल तर हा लोकशाहीला थोका आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.