संजय राऊतांच्या अटक प्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली ही पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने काल अटक केली. त्यानंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. अशात शिवसंवाद यात्रेसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी राऊतांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे. ” संजय राऊत यांना अटक करून महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचे कटकारस्थान रचले आहे हे सर्व जगजाहीर आहे.

आदित्य ठाकरे आज शिवसंवाद यात्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या माणसाने तुम्हाला घडवलं, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळं काही दिलं त्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसणं ही कधीही महाराष्ट्राची ओळख नव्हती. मी आज तुम्हाला इतकंच विचारायला आलो आहे की, हे घाणेरडं राजकारण तुम्हाला पटतंय का? हे सरकार बेकायदेशीर तर आहेच, पण गद्दार आणि बेईमानांचं सरकार आहे, अशी टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवरही टीकेची तोफ डागली. ते म्हणाले की, शिंदे- फडणवीसांचे हे सरकार एक-दीड महिन्यातच कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम सुरू केलं तेव्हा पहिलं काम कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ठाकरे यांनी म्हंटले.